31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात महाविकास आघाडीचीच घोडदौड?

राज्यात महाविकास आघाडीचीच घोडदौड?

लोकपोलचा सर्व्हे, लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही महायुतीला धक्का बसणार?

मुंबई : प्रतिनिधी
राजकीय मुद्यांवर सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गोष्टींवर काम करणा-या लोकपोलने केलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमत मिळवू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच महायुतीला दुस-या क्रमांकाच्या जागा मिळतील. मात्र, सत्ता स्थापनेसाठी त्या जागा अपु-या असतील, असेही या निष्कर्षांत दिसून आल्याचा दावा लोकपोलने केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही राज्यात लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकपोलने या निष्कर्षांबरोबरच हा सर्व्हे नेमका कसा करण्यात आला, याची माहिती दिली आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून ५०० मतदार अशा प्रकारे राज्यभरातील मतदारसंघातून जवळपास दीड लाख मतदारांचा या सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला होता. मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील ३० मतदान केंद्रे निवडण्यात आली. २० ते ३० ऑगस्ट या १० दिवसांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. राज्यभरातल्या एकूण आकडेवारीप्रमाणेच महाराष्ट्रात विभागनिहाय निकाल कसा दिसू शकेल, याचाही अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपाच्या विरोधात मत जाण्यासाठी ग्रामीण भागातील असंतोष, महागाई, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था राखण्यातील अपयश, महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आणि बेरोजगारी या गोष्टींना मतदारांनी महत्त्व दिल्याचे सर्व्हेच्या निष्कर्षात म्हटले आहे. काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, असेही यात म्हटले आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातून बाहेर जाणा-या प्रकल्पांचा मुद्दाही सर्व्हेमध्ये सहभाग घेणा-या मतदारांसाठी महत्त्वाचा ठरला.

महाविकास आघाडीला १४९ ते १५४ जागा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळतील तर सत्ताधारी महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळू शकतील. अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या मिळून ५ ते १८ जागा महाराष्ट्रात जिंकून येऊ शकतात. या आकडेवारीनुसार राज्यात महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्यात यश मिळू शकेल, असे दिसून येत आहे.

मुंबई, मराठवाडा, प. महाराष्ट्र, विदर्भात महायुतीला झटका?
विभागनिहाय आकडेवारीत विदर्भातल्या ६२ जागांपैकी महायुतीला १५ ते २०, मविआला ४० ते ४५ तर इतर १ ते ५ असे वर्गीकरण असू शकेल. उत्तर महाराष्ट्रातील ४७ जागांपैकी महायुतीला २० ते २५, मविआलाही तेवढ्याच म्हणजे २० ते २५ व इतर ० ते २ जागा निवडून येऊ शकतात. ठाणे-कोकणमधील एकूण ३९ जागांपैकी महायुतीला २५ ते ३०, मविआला ५ ते १० तर इतर १ ते ३ आमदार निवड़ून येऊ शकतात. मुंबईतल्या ३६ मतदारसंघांपैकी १० ते १५ आमदार महायुतीचे आणि २० ते २५ आमदार मविआचे तर ० ते १ आमदार इतर पक्षांचे येऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ मतदारसंघांमध्ये महायुतीचे २० ते २५, मविआचे ३० ते ३५ तर १ ते ५ इतर आमदार येतील तर मराठवाडा विभागातील ४६ मतदारसंघांपैकी १५ ते २० महायुतीचे, २५ ते ३० मविआचे तर ० ते २ इतर पक्षीय आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR