बेळगाव : यंदा सरासरीपेक्षा २८ टक्के पर्जन्यमान कमी झाल्याने बेळगावसह राज्यात हरित दुष्काळ निर्माण झाल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. राज्यातील एकूण २३६ तालुक्यांपैकी २१६ तालुके राज्य सरकारने दुष्काळी जाहीर केले आहेत. त्यात बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळाने ३०,४३२ कोटींचे नुकसान झाले आहे. केंद्राने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ४,८६० कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे.
पावसाअभावी राज्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. यंदा राज्यात ८० लाख हेक्टर क्षेत्रामध्ये शेतक-यांकडून पेरणी करण्यात आली होती. त्यापैकी ४२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. निम्म्याहून अधिक पेरणीचे क्षेत्र दुष्काळाने होरपळले आहे. पहिल्या टप्प्यात पावसाने हजेरी झाल्याने पिकांची वाढ झाली आहे. पिके हिरवी आहेत. परंतु, त्यातून पीक मिळणार नाही. अत्यल्प पावसाअभावी जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नाही. भूजल पातळी घटलेली आहे.
परिणामी पिके हिरवी दिसत असली तरी फलधारणा होण्यात अडथळा येणार आहे. त्यामुळे हरित दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने दुष्काळाची घोषणा केल्यानंतर केंद्रीय पथकाने पाहणी केली. केंद्रीय पथकाचा अहवाल सादर केल्यानंतर भरपाईचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारने केंद्राकडे ४,८६० कोटींची मागणी केली आहे. यातून दुष्काळी भागात कामे हाती घेण्याबरोबर भरपाई देण्याची कसरत करावी लागणार आहे.