लातूर : प्रतिनिधी
मनुष्याच्या अंत्यसंस्कारानंतर नदीच्या पाण्यात अस्थिविसर्जन केले जाते. यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरेला फाटा देत लातूर तालुक्यातील गंगापूरचे माजी उपसरपंच तानाजी फूटाणे व लातूर पंचायत समितीच्या माजी सभापती शितल ताई फूटाणे व त्यांच्या कुटुंबीयांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला. ७५ वर्षांच्या कै. जनार्धनराव मुकिंदा फूटाणे यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी अस्थींची राख नदीत न सोडता ती वृक्षारोपणासाठीच्या खड्ड्यात टाकली. दिवंगत जनार्धनराव फूटाणे यांचे वृक्षांवर खूप प्रेम होते. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा परीवार आहे.
गंगापूरचे माजी सरपंच कै\ जनार्धनराव फुटाणे यांच्या निधनानंतर त्यांची राख नदीत विसर्जित न करता वृक्षारोपणासाठी याचा वापर करत वडीलांना अनोखी श्रद्धांजली देण्याचा निर्णय फुटाणे कुटुंबींयाने घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर पर्यावरण संरक्षणासाठी छोटेसे कार्य केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांचे पूत्र तानाजी व बालाजी फुटाणे म्हणाले.