इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. या वादात आता पाकिस्ताननेही उडी घेत धक्कादायक दावा केला आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडी ही एकमेकांसोबत आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानंतर भाजपाने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स यांच्या आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसिफ यांनी जियो न्यूजचे पत्रकार हामिद मीर यांच्याशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्यावर पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस आघाडी हे एकत्र आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या या दाव्यावर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, काँग्रेसने जम्मू काश्मीरच्या आपल्या जाहीरनाम्यामधून कलम ३७० बाबत कुठलेही विधान केलेले नाही, तसेत आश्वासनही दिलेले नाही. मात्र जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन मात्र काँग्रेसकडून देण्यात आले आहे.
भाजप आक्रमक
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या दाव्यानंतर भाजपाकडून आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानसारखा एक दहशतवादी देश काश्मीरच्या मुद्यावर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सच्या भूमिकेला पाठिंबा देतो, अशी टीका अमित मालविय यांननी केली. जो पाकिस्तानचा मुद्दा आहे तोच काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचा मुद्दा आहे, हे आता स्पष्ट झाले आहे असे भाजपा नेते शहजाद पूनावाला म्हणाले.