23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारताला समन्स

पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारताला समन्स

परराष्ट्र मंत्रालयाचे जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकन कोर्टाने भारत सरकार आणि उच्च अधिका-यांना समन्स बजावले आहेत. यावर आता केंद्राची तीव्र प्रतिक्रिया आली असून परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी एका निवेदनात या आरोपांचे खंडन केले आहे. हा विशेष खटला दाखल झाल्यामुळे याबाबतचे आमचे मत बदलणार नाही, असेही ते म्हणाले.

मिसरी पुढे म्हणाले की, मी हे तथ्य अधोरेखित करू इच्छितो की, ही व्यक्ती (पन्नू) ज्या संघटनेचे नेतृत्व करते, ती एक बेकायदेशीर संघटना आहे, ज्यावर यूएपीएअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. ही संघटना देशविरोधी आणि विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, हे प्रकरण पूर्णपणे अयोग्य आणि सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे. आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहोत. उच्चस्तरीय चौकशीही सुरू करण्यात आली असून सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

कुणी बजावला समन्स?
न्यूयॉर्कच्या एका न्यायालयाने भारत सरकार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, माजी रॉ प्रमुख सामंत गोयल यांना समन्स बजावले आहे. हत्या प्रकरणातील आरोपी निखिल गुप्ता आणि विक्रम यादव यांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये पन्नूच्या हत्येचा कट रचल्याबद्दल अमेरिकन सरकारच्या विनंतीवरून निखिल गुप्ता याला चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली होती.

अहवालात काय?
एप्रिल २०२४ मध्ये द वॉशिंग्टन पोस्टने अहवाल दिला होता की, भारताच्या संशोधन आणि विश्लेषण विंगचे अधिकारी विक्रम यादव या कटात सामील होते, तसेच रॉ प्रमुख सामंत गोयल यांनी या ऑपरेशनला मान्यता दिली होती. मात्र, पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय दलालांचा सहभाग असल्याचा दावा पूर्णपणे अयोग्य आणि निराधार असल्याचे सांगत केंद्राने हा अहवाल फेटाळला.

कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?
गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे आणि तो दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात वॉन्टेड आहे. पन्नू हा खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिस चा प्रमुख असून, पेशाने वकील आहेत आणि स्वतंत्र शीख राष्ट्र खलिस्तानच्या मागणीसाठी जनमत चाचणीचा प्रमुख संयोजक आहेत. हे सार्वमत कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या भारतीय डायस्पोरा असलेल्या देशांमध्ये आयोजित केले गेले आहे. पन्नूने २००७ मध्ये एसएफजेची स्थापना केली आणि तो खलिस्तानचा कट्टर समर्थक बनला.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR