23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रवन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीला घातक

वन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीला घातक

संजय राऊत यांची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : देशात आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच वन नेशन वन इलेक्शनसारखे फंडे भाजप आणत आहे. भविष्यात नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल आणि त्याची ही सुरुवात आहे, असे सांगत भाजपच्या अशा धोरणांमुळे देशालाचा धोका आहे. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन संविधानविरोधी आणि देशातील लोकशाहीला घातक असल्याची टीका शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

केंद्र सरकारने बुधवारी वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. भाजपने आधी महापालिका आणि राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान देत राऊत म्हणाले, जे ३ वर्षात महापालिका निवडणुका घेऊ शकलेले नाहीत. मणिपुरात पळून जाणा-या सरकारने वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा, हे आश्चर्यकारक आहे. आपला देश लोकशाहीप्रधान असून जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. प्रत्येक प्रांत, भाषा, संस्कृती विविध आहेत. याचा विचार करून संविधानकारांनी संविधान बनवले आहे. आता संविधान बदलण्याचा प्रयत्न होत आहे.

एकाच वेळी ईव्हीएम किंवा यंत्रणेचा गैरवापर करत केंद्र आणि राज्यातील निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. संसदेत या बाबतचे विधेयक येण्यापूर्वी इंडिया आघाडीचे नेते एकत्र बसून यावर चर्चा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांवर खर्च होतो, असे त्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी देशातील लूट, भ्रष्टाचार आणि दरोडेखोरी आधी थांबवावी, अशी टीका करत निवडणुकीवर होणारा खर्च ही लूट नाही, ती लोकशाहीची गरज आहे. महाराष्ट्रात प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महापालिकेत प्रशासकांच्या माध्यमातून लूट सुरू आहेत. ही लूट करता यावी, यासाठीच महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

आघाडीत मतभेद नाहीत
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना राऊत म्हणाले, आमच्यात मतभेद नाहीत. आम्ही सर्व मित्रपक्षांशी चर्चा करीत आहोत. मुंबईसह राज्यातील जागावाटप लवकरच पूर्ण होईल. आचारसंहिता लागण्यापूर्वी आघाडीचे जागावाटप पूर्ण झालेले असेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत योग्य जागावाटप झाल्याने मोदींचा पराभव झाला त्यामुळे आता राज्यातील शिंदे, फडणवीस, अजित पवार या त्रिकुटाचा पराभव महाविकास आघाडी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिंकेल त्याची जागा हेच आमचे सूत्र असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR