24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeसंपादकीय‘तिस-या’चा फटका कोणाला?

‘तिस-या’चा फटका कोणाला?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम आणि सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी समविचारी नेत्यांनी पुण्यात एकत्र येत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा केली. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ या तिस-या आघाडीची घोषणा केली. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी तिस-या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. आपण महायुतीतून बाहेर पडलो आहोत असे ‘प्रहार’चे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उमेदवारी देत बंडाळी केली होती.

‘परिवर्तन महाशक्ती’चे चिन्ह अजून ठरलेले नाही. तिस-या आघाडीमध्ये सामुदायिक नेतृत्व असेल, यासाठी समन्वय समिती नेमण्यात येईल, ही समिती सर्व निर्णय घेईल असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. २६ सप्टेंबरपर्यंत ज्यांना ‘परिवर्तन महाशक्ती’मध्ये यायचे आहे त्यांनी यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. सामान्य माणसाला पर्याय म्हणून काम करू, स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ चेहरा देण्याचा आमचा कटाक्ष असेल असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगून ‘स्वराज्य’ पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हणाले, पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे. तशीच शिवसेना व राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. महायुती किंवा मविआ यांच्या नावावर कोणाचा सातबारा आहे का, असा सवालही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांना सोबत घेण्याचा तिस-या आघाडीचा प्रयत्न आहे. राज्यातील विविध शेतकरी प्रश्नांसह होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व संघटना व छोट्या-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन परिवर्तन आघाडी तयार करण्याचा निर्णय महिनाभरापूर्वी झाला होता. गुरुवारी तिस-या आघाडीचे परिवर्तन महाशक्तीमध्ये करण्यावर शिक्कामोर्तब झाले. या परिवर्तन महाशक्तीचा मेळावा २६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तिस-या आघाडीत मनसेचाही सहभाग असावा याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. तसेच मराठा समाजासाठी काम करणा-या शिवसंग्रामच्या प्रमुख ज्योती मेटे यांच्याबरोबरही चर्चा सुरू आहे असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

आता तिसरी आघाडी स्थापन झाल्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर काय आणि कसा परिणाम होईल हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सामान्यपणे लोकसभा निवडणुकीत जे मुद्दे प्रचारामध्ये चालले तेच मुद्दे आता येणा-या निवडणुकीत चालतील का हा मुख्य विषय आहे. लोकसभा निवडणुकीत चाललेले तीन मुद्दे म्हणजे, शेतक-यांच्या समस्या, मराठा आरक्षणावरून सुरू असलेले आंदोलन आणि ‘संविधान खतरे में है’ हा विरोधकांनी केलेला प्रचार. या तीन मुद्यांभोवतीच राजकारण तापले आणि त्यानुसार निकाल आले. आगामी निवडणुकीत सुद्धा शेतक-यांच्या समस्या आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हे दोन मुद्दे पेटलेले राहतील. त्या अनुषंगाने सत्ताधारी महायुतीमध्ये थोडी हालचाल दिसत आहे. विविध प्रकारच्या आकर्षक योजना सादर केल्या जात आहेत. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना त्यापैकीच एक. तरीसुद्धा महायुतीच्या नेत्यांना दोन विषयांची चिंता आहे.

एक म्हणजे राज्यात पुन्हा सुरू झालेले जरांगे-पाटील यांचे आंदोलन आणि दुसरे, सध्या राज्यात अनेक भागात दिसणारी शेतक-यांची हलाखीची परिस्थिती. यावर तोडगे कसे काढायचे याबाबत सत्ताधारी पक्षात खल सुरू आहे. गत काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नेत्यांची भरती प्रक्रिया वाढत चालली आहे. त्यामुळे जनतेमध्ये विरोधी पक्षाच्या बाजूने कल वाढलेला दिसू शकतो. त्यात आता तिस-या आघाडीची भर पडली आहे. त्याचा फायदा कोणाला आणि कसा मिळेल याबाबत निरीक्षकांचे मत असे की, साधारणपणे तिस-या आघाडीचा फायदा सत्ताधा-यांना होऊ शकतो. कारण महाविकास आघाडीची मते ही सर्वसाधारणपणे सरकारच्या विरोधात असलेली मते आहेत आणि तिस-या आघाडीच्या नेत्यांचा सूरसुद्धा सरकारच्या विरोधातच आहे. त्यामुळे तिस-या आघाडीचा फटका काही प्रमाणात महाविकास आघाडीला बसेल. अर्थात तिस-या आघाडीकडे उमेदवार आहेत का हेही बघावे लागेल.

राज्याच्या विविध भागात उमेदवार उभे करावे लागतील. तिसरी आघाडी म्हणून जर हे नेते एकत्र लढणार असतील तर त्यांना राज्याच्या वेगवेगळ्या भागात स्वत:चे अस्तित्व दाखवावे लागेल. किमान शंभर मतदारसंघांमध्ये तरी उमेदवार उभे करावे लागतील. त्यांना आर्थिक बळ द्यावे लागेल, प्रचाराची साधनसामग्री द्यावी लागेल. हे सारे करण्यासाठी आता केवळ दीड महिन्याचा अवधी आहे. समजा तिस-या आघाडीने उमेदवार दिले आणि त्यातील काही निवडून आले तरी निवडणूक झाल्यानंतर त्या उमेदवाराची भूमिका काय असेल ते सांगता येत नाही. असेही म्हटले जाते की, तिस-या आघाडीचा फायदा नेहमीच मुख्य स्पर्धेत जे दोन पक्ष असतात त्यांच्यापैकी एकाला मिळतो. आघाडीला मिळत नाही. म्हणजे दिल्लीत गुजरात किंवा गोव्यात ‘आप’ने उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपलाच मिळणार. तसे महाराष्ट्रात तिस-या आघाडीचा फायदा महायुतीला मिळण्याची शक्यता अधिक आहे.

महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारण हवे आहे, ते आम्ही देऊ इच्छितो असे तिस-या आघाडीचे म्हणणे आहे. परंतु त्यासाठी त्यांनी लवकर सुरुवात करायला हवी होती. कारण जागावाटप, उमेदवारांचे चेहरे निश्चित होणे यासाठी आता खूपच थोडा अवधी शिल्लक आहे. मतदारांना प्रस्थापित चेह-यांचा आणि त्यांनी बदललेल्या भूमिकांचा कंटाळा आला असेल तर एक नवा पर्याय म्हणून तिस-या आघाडीकडे बघितले जाईल. विरोधकांची मते विभाजीत करण्यासाठी सत्ताधारी तिस-या आघाडीचा वापर करतील काय याचे उत्तर काळच देईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR