लातूर : प्रतिनिधी
शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात मागील १३ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी प्रवर्गाच्या आरक्षणापासून धनगर समाज वंचित असून सरकार एसटी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक असल्याचे वेळोवेळी सांगून वेळकाढूपणा करत आहे, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा नाहीतर सरकारची धनगरांशी गाठ आहे, असा इशाराच उपोषणकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी सरकारला दिला. १३ दिवस होऊनदेखील या आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघालेला नसल्याने धनगर आंदोलन आक्रमक झाले आहे.
धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सुरु असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा तेरावा दिवस आहे. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनस्थळी धनगर समाजाचा उपोषणकर्त्यांच्या भेटी वाढल्या आहेत. यावेळी मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी सरकारने तातडीने याबाबत तोडगा काढावा, अन्यथा सकल धनगर समाज तुम्हाला कदापिही माफ करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे मागील ७०वर्षात धनगर समाजाची पिछेहाट झाली असून समाजात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असून धनगर समाज मुख्य प्रवाहात आला नसल्याची खंत
उपोषणकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी व्यक्त केली.