मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत आम्ही काही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता मात्र येणा-या विधानसभा निवडणुकीत वंचितचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणीही पाठिंबा मागितला तरीही आम्ही तो देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर शनिवारी मांडली. दरम्यान वंचितने आज आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला.
लोकसभा निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत शमिभा पाटील या तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश असून त्यांना जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून आम्ही उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या विचारधारेशी खंबीर राहून, खरे प्रतिनिधित्व आणि राजकीय सत्ता मिळवण्याचा तसेच काही कुटुंबाचे वर्चस्व मोडून आम्ही वंचित बहुजन समूहांना प्रतिनिधित्व दिले आहे.
बौद्ध समाजातील २ उमेदवारांच्या व्यतिरिक्त धिवर, लोहार, वडार, मुस्लिम या वंचित जाती समूहांना पहिल्या यादीत स्थान दिले आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येईल तसेच आणखी काही पक्ष लवकरच आमच्या आघाडीत सामील होतील, असेही आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, वंचितचे सहयोगी पक्ष असलेल्या भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या २ पक्षाच्या उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी या वेळी केली. त्यानुसार भारत आदिवासी पार्टीचे सुनील गायकवाड हे चोपडामधून तर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरिश उईके हे रामटेकमधून उमेदवार असतील, असे सांगितले. संयुक्त जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा निवडणूक घोषित होण्यापूर्वीच आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार असून राज्याचा विकास आणि रोजगार हे २ प्रमुख मुद्दे आमच्या जाहीरनाम्यात असतील, असेही त्यांनी सांगितले.
…तर काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूक लढवू नये
तिस-या आघाडीचा फायदा हा नेहमीच भारतीय जनता पार्टीला होतो, याकडे लक्ष वेधता आंबेडकर म्हणाले की, राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अशी भीती वाटत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये. निवडणुकाही लढवू नयेत. त्यांचा पक्ष त्यांनी गुंडाळून ठेवावा. अन्य कुणाला फायदा व्हावा म्हणून आम्ही निवडणुका लढवत नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर रणांगणात उतरतो. राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांची मागणी करणारी यादी आमच्याकडे दिली आहे; परंतु त्याच वेळी ते अन्य काही पक्षांशी चर्चा करत आहेत तर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या सोबत चर्चा झाली मात्र त्यांचे आणि आमचे जमणार नाही त्यामुळे कडू आमच्या सोबत येणार नाहीत, असे आंबेडकर यांनी सांगितले.
वंचितचे उमेदवार
शमिभा पाटील (रावेर), सविता मुंढे (सिंदखेडराजा), मेघा किरण डोंगरे (वाशिम), निलेश विश्वकर्मा (धामणगाव रेल्वे), विनय भांगे (नागपूर दक्षिण पश्चिम), डॉ. अविनाश नन्हे (साकोली), फारुक अहमद (नांदेड दक्षिण), शिवा नारांगले (लोहा), विकास दांडगे (औरंगाबाद पूर्व), किसन चव्हाण (शेवगाव), संग्राम माने (खानापूर)