नवी दिल्ली : उत्तराखंडमधील कोसळलेल्या सिल्कयारा बोगदा दुर्घटनेबाबत अदानी समूहाने स्पष्टीकरण जारी केले आहे. अदानी समूहाने या निर्माणाधीन बोगद्याच्या बांधकामाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या बोगद्याच्या उभारणीत समूह किंवा अदानी समूहाची कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी नसल्याचे अदानी समूहाने सांगितले. दोन आठवड्यांपूर्वी बोगद्याचा एक भाग कोसळला असून ४१ कामगार आत अडकले आहेत. सध्या या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
उत्तराखंडमधील बोगद्याच्या दुर्दैवी दुर्घटनेसोबत अदानी समूहाचे नाव जोडण्यात येत असून त्यावर अदानी समूहाने स्पष्टीकरण दिले आहे. बोगद्याच्या बांधकामात कंपनीचा किंवा त्यांच्या कोणत्याही उपकंपनीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही असे अदानी समूहाने म्हटले आहे. तसेच काही घटकांकडून या खोट्या अफवा पसरवण्यात येत असून त्याचा निषेध करतो असेही अदानी समूहाने म्हटले आहे.
या बोगद्याच्या कामाचा संबंध हा अदानी समूहाशी जोडण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर केला जात आहे. त्यावर या गोष्टी म्हणजे निव्वळ अफवा असून अदानी समूहाचा किंवा त्यांच्या कोणत्याही उपकंपनीचा या बोगद्याच्या कामाशी कोणताही संबंध नाही असे अदानी समूहाने म्हटले आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये एक निर्माणीधान बोगदा कोसळला असून त्यामध्ये ४१ कामगार गेल्या १७ दिवसांपासून अडकलेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून बचतकार्य अंतिम टप्प्यात आले आहे.