बीड : प्रतिनिधी
मुंडे बहीण-भाऊ एक झाले आणि आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय, असे म्हणत रासपचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का तर धनंजय मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान असणार आहे. तर प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर परळीत बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.
बीडच्या परळीमध्ये राजकारणात घडामोडी घडत आहेत. रासप गटाचे व पंकजा मुंडे यांच्या सोबत राहणारे राजाभाऊ फड हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे त्यांनी बॅनर देखील लावले आहेत. यामुळे परळीतील राजकारण तापणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान फड म्हणाले, की मुंडे भाऊ-बहीण वेगळे होते त्यावेळी नक्कीच पंकजा मुंडे यांच्यासोबत होतो. मागची १५ वर्षे जानकर साहेबांच्या पक्षात काम केले. यामुळे जानकर यांच्यासमोर हा विषय ठेवला असता त्यांनी काहीही प्रत्युत्तर दिले नाही. परळीतील माझी वाटचाल ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहे; असे म्हणत राजाभाऊ फड यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.
उद्या मुंबईत करणार प्रवेश
रासपचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. राजाभाऊ फड हे रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काही निवडणुकांत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत रहात प्रचार देखील केला होता.