धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विश्वास मोहिते यांनी २४ नोव्हेंबर रोजी नामंजूर केला होता. त्यानंतर एसआयटी पथकाने रविवारी मध्यरात्री बोर्डे यांना नगर येथून ताब्यात घेतले आहे.
धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात यश येत नसल्याने आता या प्रकरणाचा तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, त्यात डीवायएसपी स्वप्नील राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड यांचा समावेश आहे.
या पथकाने जलद गतीने चौकशीची चक्रे फिरवून बोर्डे यांना रविवारी मध्यरात्री नगर येथून ताब्यात घेतले आहे. धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषदेचे सदस्य आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. अखेर तीन महिन्यानंतर बोर्डे यांना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.