बुलडाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाले होते. पिक विम्याचे पैसे न मिळाल्याने रविकांत तुपकर यांचे कृषी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरु होते. याचवेळी त्यांना अटक करण्यात आली आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात मुक्काम आंदोलन सुरु होते. जोपर्यंत पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही,तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात तुपकर मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता.
रविकांत तुपकर बिस्तरा घेऊन कृषी अधीक्षक कार्यालयात पोहोचले होते. पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे बुलडाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात मुक्काम आंदोलन सुरु होतं. मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. सरकारच्या हुकूमशाहीचा आम्ही निषेध करतो, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा मागणाऱ्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता मग शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाहीत? असा सवाल अॅड शर्वरी तुपकर यांनी केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी गावागावात आंदोलन सुरू करा, असं आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलं आहे.