नांदेड : प्रतिनिधी
नेरली कुष्ठधाम (तालुका नांदेड) येथे नळाला दूषित पाणी आल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी अनेक रुग्णांना उलट्या व मळमळ होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. जवळपास ३०० रुग्णांना याचा फटका बसला असून ६ जण गंभीर असल्याची माहिती गावक-यांनी दिली आहे. बाकीच्या रुग्णांवर गावातच शासकीय रुग्णालयातील कर्मचारी उपचार करत आहेत.
नेरली (तालुका नांदेड) या गावात पिण्याच्या पाण्याची टाकी दूषित असल्याच्या कारणामुळे पाण्यातून विषबाधा झाली असावी त्याचबरोबर पाण्याचे शुद्धीकरण न केल्यामुळे नागरिकांना पाण्यातून विषबाधा झाली असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. गावामध्ये जवळपास सर्वच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत अद्याप कुठेही गुन्हा नोंद झाला नव्हता. चौकशीअंती गुन्हा नोंद होईल अशी अपेक्षा आहे.
रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी डॉक्टरांच्या टीमसह नेरली कुष्ठधाम येथे धाव घेतली. रात्रीपासून आरोग्य पथक गावात तळ ठोकून असून गावातील अस्वस्थ रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे.
सहा जणांची प्रकृती गंभीर
या घटनेत सहा जणांची प्रकृती ही गंभीर आहे. या सर्वांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय ग्रामस्थानी वर्तवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील या घटनेची माहिती घेतली असून आरोग्य यंत्रणेला योग्य त्या उपाय योजना करण्यास सांगण्यात आले आहे.