कृष्णगिरी : वृत्तसंस्था
तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत शनिवारी पहाटे भीषण आग लागली. स्फोटानंतर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीमुळे प्लांटचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. प्लांटच्या सेलफोन उत्पादन विभागात ही आग लागली. त्यानंतर प्लांटमधील सर्व कर्मचा-यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कारखान्यात आग लागली तेव्हा सुमारे १,५०० कामगार कामावर होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. श्वासोच्छवासाचा त्रास होत असलेल्या तीन कर्मचा-यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी १०० हून अधिक पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मोबाईल फोन अॅक्सेसरीजच्या पेंटिंग युनिटमध्ये ही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. टीईपीएल कंपनी ही आयफोनसाठी वेगवेगळ्या अॅक्सेसरीज बनवते. या कंपनीत सुमारे ४,५०० कर्मचारी काम करतात. यामध्ये बहुतांश महिला आहेत. आगीनंतर युनिटमधून काळ्या धुराचे ढग निघत होते. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कृष्णगिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. थनागदुराई यांनी सांगितले की, आग लागली तेव्हा मोबाईल पॅनल पेंटिंग युनिटमध्ये काही कर्मचारी काम करत होते. या युनिटमध्ये रसायनांचा साठाही होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागली, त्यानंतर सर्व कर्मचा-यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. गुदमरल्यामुळे तीन कर्मचा-यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.