मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अमरावतीच्या दौ-यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचा-यांचा पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत आणि तिजोरी रिकामी होईल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
महिलांना असे पैसे दिल्यापेक्षा त्यांच्यासाठी नवनवीन उद्योग आणले पाहिजेत. त्यांना रोजगार देऊन सक्षम केले पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही. सत्ताधा-यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातल्या जात असेल तर ते चुकीचे आहे. ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत तिजोरीत ठणठणाठ होऊ शकतो, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या वक्तव्याचे प्रणिती शिंदेंकडून समर्थन
दरम्यान, राज ठाकरे यांनी अमरावतीत केलेल्या वक्तव्याचे महाविकास आघाडीच्या नेत्या आणि काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. राज्यासाठी राबराब राबणा-या नोकरदारांच्या पगारी करायला जर सरकारकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.