नाशिक : जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कृषि उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याला बसला आहे. एरवी असलेल्या आवकेपेक्षा ७५ टक्क्यांनी कमी आवक झाल्याने बाजारभाव उसळले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत.
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदे, नगदी पिके यांसोबतच भाजीपाल्याचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. हे नुकसान झाल्याने रोज बाजार समितीमध्ये दाखल होणा-या भाजीपाल्याची आवक अतिशय कमी झाली. इतर वेळी दोन ते अडीच हजार क्विंटल असलेली भाज्यांची आवक सोमवारी (दि. २७) चारशे क्विंटल झाली आहे.
मेथी, शेपू, यांच्यासह इतर भाजीपाल्यांच्या दरामध्ये तुलनेने वाढ दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी अगदी पाच ते दहा रुपयांवर आलेली कोथिंबिरीची मोठी जुडी आता ३० रुपयांवर गेली आहे. याचबरोबर मेथी आणि शेपूची मोठी जुडी १५ ते २० रुपयांना मिळत आहे.