नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना काळात पृथ्वीवर प्रथमच लॉकडाऊनचा प्रयोग राबवला गेला. या लॉकडाऊनमध्ये उद्योग, कारखाने बंद होते. त्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीच्या तापमानावर झाला होता. पृथ्वीवरील प्रदूषणात घट नोंदवली गेली. परंतु हा परिणाम फक्त पृथ्वीपुरता मर्यादीत नव्हता. त्याचा प्रभाव चंद्रापर्यंत दिसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
भारतीय संशोधकांनी चंद्राचा अभ्यास केला. त्यात २०२० मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात पृथ्वीवर कडक लॉकडाऊन असताना चंद्राचे तापमानही सामान्यपेक्षा कमी झाल्याचे म्हटले आहे. रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.
भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे के. दुर्गा प्रसाद आणि जी. अंबिली यांनी म्हटले आहे की, आमच्या ग्रुपने अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. आणि हे एक वेगळे संशोधन आहे. २०१७ ते २०२३ या कालावधीत चंद्रावरील विविध ठिकाणच्या तापमानाचा तपशील गोळा केला. त्यात इतर वर्षांच्या तुलनेत लॉकडाऊनच्या वर्षातील तापमान सामान्यपेक्षा ८ ते १० केल्विनने कमी असल्याचे आढळून आले. पृथ्वीवर लॉकडाऊन असल्यामुळे किरणोत्सर्ग कमी झाला. त्याचा परिणाम चंद्रावरही दिसून आला, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. २०२० मध्ये चंद्रावरील तापमानात घट झाली होती. पुढील दोन वर्षात तापमानात पुन्हा वाढ झाली कारण पृथ्वीवर लॉकडाऊन नव्हते.
नासाच्या लूनार ऑर्बिटरकडून डेटा घेतल्यानंतर हा अभ्यास करण्यात आला. प्रसाद यांनी म्हटले की, या अभ्यासासाठी सात वर्षांचा डेटा घेण्यात आला. यापैकी तीन वर्षे २०२० पूर्वीची आणि तीन वर्षे नंतरची आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी झाल्याचे दिसले. यानंतर पृथ्वीच्या वातावरणातील किरणोत्सर्गामुळे चंद्राच्या तापमानावरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
चंद्र पृथ्वीच्या किरणोत्सर्गाचा एक अॅम्प्लीफायर म्हणून कार्य करतो. या संशोधनातून चंद्राच्या तापमानावर मानव कसा प्रभाव टाकू शकतो हे सिद्ध होत आहे. ते म्हणाले की, सौर क्रियाकलाप आणि हंगामी प्रवाह भिन्नतेमुळे चंद्राच्या तापमानावरही परिणाम होतो. पृथ्वीच्या किरणोत्सर्गातील बदल आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील बदल यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी अधिक डेटाची आवश्यकता आहे, असे या संशोधनातून दिसले आहे.