रेणापूर : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवास गुरुवार दि ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार असून या उत्सवाची श्री रेणुका देवी विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे श्री रेणुका देवी नवरात्र, दसरा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शारदीय नवरात्र महोत्सवाला अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात गुरुवार दि . ३ ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे. लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि सीमावर्ती भागातील भक्तांचे श्रद्धास्थान असणा-या रेणापूर येथील श्री. रेणुका मातेची घटस्थापनाही त्याच दिवशी होणार आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा तथा तहसीलदार मंजुषा भगत यांच्या हस्ते दुपारी १ वाजता घटस्थापना होईल.
या निमित्ताने ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे मान्यवर व भक्तांच्या हस्ते रेणुका मातेची महापूजा, नैवेद्य, आरती तसेच इतर कार्यक्रम होणार आहेत. या कलावधित महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी असून या दिवशी रात्री ९ वाजता रेणुका मातेची शहरात पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. वाटरपु्रफ मंडप उभारण्यात आला आहे.आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्य या सुविधांकडे लक्ष दिले जाणार आहे. गेल्या कांही वर्षात देवीच्या दर्शनासाठी चालत येणा-या भाविक-भक्तांच्या संख्येत वाढ होत असून विविध संस्था, संघटना व युवकांच्या वतीने
पाणपोई आणि महाप्रसाद वाटप करण्यात येते.