जळकोट : प्रतिनिधी
तालुक्यामध्ये गत आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे यामुळे शेतकरी आपले सोयाबीन काढून घेत आहेत. राष्ट्रीय महामार्गालगतचे जे अनेक शेतकरी आहेत ते शेतकरी अगदी राष्ट्रीय महामार्गावरच सोयाबीनच्या गंजी रचून ठेवत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे .
बिदर ते नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० आहे. या मार्ग महामार्गावरून अनेक वाहने ये- जा करीत असतात. राष्ट्रीय महामार्गावर कुठलाच अडथळा राहू नये असा नियम आहे परंतु या राष्ट्रीय महामार्गावर जळकोट तालुक्यात अगदी राष्ट्रीय महामार्गावरच शेतातील सोयाबीन काढून ते जमा करून अगदी रस्त्यावरच आणून ठेवत आहेत तसेच त्याच ठिकाणी राशी केल्या जात आहेत त्यामुळे याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. तालुक्यात यावर्षी जवळपास वीस ते पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे.
ऑगस्ट महिना पूर्ण पाऊस पडला त्यामुळे अति पावसामुळेही सोयाबीन गेले तसेच अनेक ठिकाणी ढगफुटी झाली व अतिवृष्टी झाली जळकोट तालुक्यात चार ते पाच वेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे नदीकाठची पिके वाहून गेली तर सकल भागामध्ये पाणी साठून सोयाबीनचे नुकसान झाले. आता उघडीप दिल्यामुळे उरलेसुरले सोयाबीनही शेतकरी हे काढून घेत असल्याचे दिसून येत आहे. येणा-या दोन ऑक्टोबरपासून आणखी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे यामुळे शेतक-यांनी अधिकचे पैसे देऊन सोयाबीन काढून घेणे सुरु केले आहे. शेतक-यांनी सोयाबीन काढून ते राष्ट्रीय महामार्गावर जमा करू नये किंवा राष्ट्रीय महामार्गावर मळणी यंत्राच्या साह्याने राशी करू नये, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.