आठवड्यात दुस-यांदा बैठक, निवडणुकीआधी लोकप्रिय निर्णयावर भर
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. त्यामुळे महायुती सरकारच्या निर्णयांचा धडाका सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकांचाही धडाका सुरू आहे. राज्य मंत्रिमंडाळाची आता पुन्हा गुरुवारी बैठक होणार आहे. एकाच आठवड्यात दुस-यांदा बैठक होत आहे. शेकडो शासन निर्णय रोज काढले जात आहेत. त्यासाठी मंत्रालयात मंत्री आणि लोकप्रतिनिधींची चांगलीच धावाधाव सुरू आहे.
आगामी विधानसभा निवडणूक अटीतटीची असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे थेट लोकांशी संबंधित असलेल्या योजना सुरू करण्याचा धडाका महायुती सरकारने लावला आहे. आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे एका आठवड्यात दोन-दोन मंत्रिमंडळ बैठका होताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चाळीसहून अधिक निर्णय घेतले. दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर आता उद्या पुन्हा एकदा गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.
लोकप्रिय योजनांचे निर्णय होताना पाहायला मिळत आहेत. मात्र महायुतीमधील नेत्यांच्या लाभाचे निर्णयही मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहेत. अनेक निर्णय हे नियम डावलून घेतले जात असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मंत्रीमंडळ बैठकीत तर शासन निर्णय काढण्याचा धडाका सुरू आहे. दिवसाला शेकडो शासन निर्णय जारी होत आहेत. त्यासाठी आमदारांपासून मंत्र्यांची चांगलीच धावाधाव सुरु आहे. आचारसंहितेच्या आधीच टेंडर काढण्यासाठी सर्वांनी ताकद लावली आहे. विशेषत: लोकप्रतिनिधींना निधी मिळणारे शासन निर्णय सर्वाधिक आहेत.
हजारो कोटींच्या घोषणांचा पाऊस
राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. मात्र हजारो कोटींच्या घोषणांचा आणि विकास कामांचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. सामाजिक विभाग, आदिवासी विभाग, नगरविकास विभाग, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वाधिक शासन निर्णय जारी होत आहेत.
मतांसाठी सरकारची
शेवटची धडपड : चेन्नीथला
राज्यातील महायुती सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे; परंतु सरकारकडे पैसा नाही आणि निवडणूक होणार असल्याने त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. यामुळे केवळ मते मिळवण्यासाठी महायुती सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी येथे केली.