28 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रआता लढाई जनतेच्या न्यायालयात : उद्धव ठाकरे

आता लढाई जनतेच्या न्यायालयात : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे; पण अजूनही न्याय मिळत नाही आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत. आता हात दुखायला लागले आहेत त्यामुळे आता आम्ही थेट जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहोत, असे शिवसेना ( ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता ‘मशाल’ हे चिन्हं घेऊनच विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केली असून घटस्थापनेच्या मुहुर्तावर पक्षाच्या मशाल चिन्हाचा उल्लेख असलेले नव्या प्रचारगीताचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगळीकडे तोतयागिरी सुरू असून घटनाबा सरकार वारेमाप भ्रष्टाचार करीत आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. कोणीही वाली राहिलेला नाही. अशा वेळी आई जगदंबेला हाक मारल्यावर ती भक्तांच्या दर्शनासाठी येते. इतिहासात त्याचे दाखले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी संपूर्ण देशावर अराजक आले होते. तेव्हा संत एकनाथ यांनी ‘बये दार उघड..’ अशी आरोळी दिली होती. आता एकनाथांच्या नावाने तोतयागिरी करणारे खूप दिसत आहेत, असा खोचक टोला ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लगावला.

दसरा मेळाव्यात सर्वांना उत्तर देणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, शिवाजी पार्कला दसरा मेळावा होणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना आमच्यावर जे काही बोलायचे आहे ते बोलू द्या. या सर्वांचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार आहे. सौ सौनार की और एक लोहार की… असा इशारा ठाकरेंनी या वेळी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR