मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजर बनून बसलेली आहेत तोपर्यंत सरकार कसे पडेल? असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना प्रत्युत्तर दिले आहे. सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, असे म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत संजय राऊतांना टोला लगावला होता.
विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, सरकार पडणार नाही. हे तुमचं काम आहे का? सरकार पाडण्यासठी आकडा पाहिजे मग हा आकडा तुम्ही लावू नका. जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजर बनून त्या खुर्चीवर बसलेली आहेत तोपर्यंत सरकार कसे पडेल? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले, बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष पदावर त्याच विचाराची व्यक्ती बसलेली आहे. बेकायदेशीर सरकारला संरक्षण देत आहे. अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून सरकारची वकिली करू शकत नाही.
बळिराजा संकटात आणि मुख्यमंत्री प्रचारात मग्न
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एक दिवसाच्या तेलंगणा दौ-यावर आहेत. या दौ-यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, तेलंगणामध्ये भाजप जिंकणार नाही. तेलंगणामध्ये लढाई काँग्रेस आणि केसीआर यांच्यामध्ये सुरू आहे. भाजप या स्पर्धेत देखील नाही. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र हे तेलंगणाच्या प्रचारामध्ये मग्न झाले आहेत. तेलंगणामध्ये तुम्हाला कोण विचारते? तुम्ही राज्यात थांबा, तेलंगणामध्ये तुमच्याशिवाय निवडणुका होणार नाहीत का? भारतीय जनता पक्षाचा तेलंगणामध्ये पराभव निश्चित आहे.
कोण पुरुष, कोण युगपुरुष २०२४ ला कळेल : राऊत
महात्मा गांधी हे महापुरुष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष आहेत असे वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी केले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, २०१४ नंतर कोण पुरुष आहे, कोण युगपुरुष आहे, कोण महापुरुष आहे हे कळेल. आम्ही सांगणार नाही हे जनता सांगणार आहे. महात्मा गांधींना विश्वाने मानले आहे.