27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeक्रीडाचार महिन्यांपासून पाक खेळाडूंचा पगार रखडला

चार महिन्यांपासून पाक खेळाडूंचा पगार रखडला

पीसीबीची सारवासारव

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० विश्वचषकात श्रीलंकेला पराभूत करुन विजयी सलामी दिली. तीन तारखेपासून यूएईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा ३१ धावांनी धुव्वा उडवला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला. पण, पाकिस्तानच्या विजयानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानी खेळाडूंना मानधन न दिल्यामुळे चाहत्यांनी पीसीबीला फटकारले. नाना कारणांनी नेहमी चर्चेत असणारे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे.

जून २०२४ पासून पाकिस्तानच्या खेळाडूंना काहीच मानधन मिळाले नसल्याचे उघड झाले. आता यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण देत लवकरच यावर तोडगा काढला जाईल असे सांगितले. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार पीसीबीने म्हटले की, खेळाडूंना मानधन देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अंतिम यादी मंजूर होताच १ जून २०२४ पासूनच्या कराराबद्दल माहिती दिली जाईल. खूप घडामोडी चालल्या आहेत आणि सर्व बाबींचे निराकरण करण्यासाठी वेळेची कमतरता आहे.

दरम्यान, सराव सामन्यांमध्ये सलग दोन पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने स्पर्धेतील पहिला सामना जिंकला. २२ वर्षीय सना फातिमाच्या नेतृत्वात शेजा-यांचा संघ आहे. तिने श्रीलंकेविरुद्ध २० चेंडूत ३० धावांची साजेशी खेळी केली. माजी कर्णधार निदा दार २३ चेंडूत २२ धावा करून बाद झाली. पाकिस्तानने दिलेल्या ११७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघ अवघ्या ८५ धावा करू शकला. त्यांनी निर्धारित २० षटकांत ९ बाद ८५ धावा केल्याने ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानकडून सादिया इक्बालने सर्वाधिक तीन तर फातिमा सना आणि नशरा संधू यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR