जालना : दसरा मेळाव्याला तुफान गर्दी होणार आहे. हा मेळावा पारंपारिक होणार आहे, जातीचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. खूप दिवसांनी इच्छा पूर्ण झाली म्हणून संपूर्ण ताकदीने लोक येणार असून ५० ते ५५ हजार फक्त स्वयंसेवक आहेत. दु:खापासून समृद्धीकडे जाण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला यायला पाहिजे कारण हा सामाजिक मेळावा आहे. राजकीय पक्षाच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्याला या, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज केले. त्यांनी अंतरवाली सराटीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, एका तासात मराठा आणि कुणबी एकच आहे असा शासन निर्णय होऊ शकतो. असे घडले आहे. या अगोदर. तिन्ही गॅजेट आज लागू होऊ शकतात. मर्यादा वाढायचे ठरले तर एका दिवसात होऊ शकते. मला शंभर टक्के खात्री आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आमची मागणी मान्य केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत. लोकसभेत मोदी महाराष्ट्रात होते तरी मराठ्यांनी दणका दिला. १३ महिन्यात तयारीच केली आहे ना, यांच्या एकदा याद्या होऊ द्या मग बघू. मराठ्यांना डावलून राज्यात सत्ता आणणे सोपी गोष्ट नाही, असा थेट इशारा जरांगे यांनी सरकारला यावेळी दिला.
बोलबच्चन जमणार नाही
सत्ताधारी आणि विरोधकांना विनंती आहे की, ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून मराठ्यांना फसवू नका. तुमच्या दोघांच्या नाटकात मराठ्यांच्या पोरांचा बळी घेऊ नका. महायुती आणि महाविकास आघाडी मिळून आचारसंहिता लागण्यापूर्वी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या आणि मग कोट्याची मर्यादा वाढवा. सगळ्या मराठ्यांना सांगतो हे सगळे नाटक आहे. आपण आपल्या ध्येयावर राहू. तुम्ही मर्यादा वाढवा पण ओबीसीतून मराठ्यांना ५० % आरक्षण द्या असे करत असाल तर दोघांचेही कौतुक. पण बोलबच्चन करणार असाल तर नाही जमणार, असा सणसणीत टोला राजकीय पक्षांना जरांगे यांनी लगावला.
तुमच्यापेक्षा हुशार शेतकरी आहे
निवडणुकीत काय भूमिका असेल यावर बोलताना जरांगे म्हणाले की, यांना निवडून आणण्यासाठी आमच्या गरिबांनी मारामारी केल्या. दुस-या दिवशी हे म्हटले आम्ही एक आहोत. तुम्ही मित्र आणि आम्ही शत्रू किती कमाल आहे. तुमच्यापेक्षा हुशार गुडघाभर चिखलात काम करणारा शेतकरी आहे. तुम्ही दगा फटका केलेला जनतेला मान्य नाही, अशी टीका जरांगे यांनी राजकीय पक्षांवर केली. मागील एक महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही, आम्ही आमच्या संयमाने राहतो, मी त्यावेळेस सांगितले होते गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, गुलाल रुसवायची ताकद मराठ्यांमध्ये आहे, अशा शब्दात जरांगे यांनी राजकीय पक्षांना निर्वाणीचा इशारा दिला.