सुरक्षा जवानांची मोठी कारवाई, शस्त्रसाठा जप्त
नारायणपूर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी सुरक्षा दलाला मोठे यश आले. चकमकीत सुरक्षा दलाने ३० नक्षलवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून जवानांना मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे सापडली. नक्षलवाद्यांकडे एके ४७ असल्याचे समोर आले. आज दुपारी सुरक्षा जवान सीमारेषेवर पोहोचले होते. त्यानंतर लगेचच चकमक सुरू झाली. उशिरापर्यंत चकमक सुरूच होती. चकमकीत सहभागी झालेले सर्व जवान सुरक्षित असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांसोबतची चकमक अबूझमाड येथे झाली. हा परिसर नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात सीमा भागात येतो. अबूझमाड क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी कारवाई केली. सुरक्षा दलाला आतापर्यंत १४ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्याचबरोबर एके-४७, एसएलआरसह अन्य शस्त्रे सापडली आहेत.
गेल्या काही महिन्यांत छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांशी चकमकीच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी २३ सप्टेंबर रोजी नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले होते. ज्यात २ पुरुष आणि १ महिलेचा समावेश होता. त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे २४ सप्टेंबरला सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाने दोन नक्षलवाद्यांना ठार केले होते. चकमकीनंतर दोघांचे मृतदेह त्यांचे सहकारी घेऊन गेले होते. या वर्षभरात छत्तीसगडच्या बस्तर क्षेत्रात झालेल्या वेगवेगळ््या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १५० च्या पुढे आहे.
६०० जवान तैनात
दंतेवाडा बॉर्डरवर नक्षलवाद्यांची कुमूक आल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती. त्यानंतर दंतेवाडा जिल्ह्याच्या बॉर्डरवर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आणि शुक्रवारी दुपारीच कारवाई सुरू केली. पोलिसांची खूप मोठी कुमक येथे तैनात आहे. जवळपास ६०० पेक्षा जास्त जवान तैनात असून ६ नक्षली कंपन्या असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यावेळी
सुरक्षा दलाची कारवाई
राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे आज नक्षलग्रस्त भागातील बस्तर दौ-यावर होते. त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष रमण सिंह आणि वनमंत्री केदार कश्यपदेखील दौ-यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौ-यावेळीच सुरक्षा दलाने ही मोठी कारवाई केली.