अमरावती : प्रतिनिधी
अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबाद येथे स्वामी यति नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आता अमरावतीतही उमटताना बघायला मिळाले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणा-या स्वामी यति नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर मोठ्या संख्येने जमाव आलेला होता.
दरम्यान काही वेळात हा जमाव हिंसक झाला आणि अचानक नागपुरी गेट पोलिस ठाण्यात हजर असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे आणि पोलिस स्टेशनचे देखील नुकसान झाले आहे.
दगडफेकीत कर्मचारी जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, जवळ जवळ दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव याठिकाणी जमला होता. दरम्यान, हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना रात्री अखेर हवेत गोळीबार आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज करावा लागला. तर रात्री एकनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये २९ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. सध्या या परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याचे आवाहन पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.