15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात जि. प. विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश

राज्यात जि. प. विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश

शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य-एक गणवेश धोरण’ राबविण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. त्यामुळे सर्व राज्यांतील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना समान रंगाचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत दिले जातील.

यंदाही सर्व राज्यांतील विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्याचे धोरण ठरले होते. परंतु, ऐनवेळी धोरणात बदल करीत गणवेशाचे पैसे शाळांना देण्यात आले. त्यामुळे पुढील वर्षी नवीन शैक्षणिक वर्षात तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनाही देण्याबाबतचा शासन निर्णय झालेला आहे.

यंदा शाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी असताना सर्वच विद्यार्थ्यांना एकाच रंगाचे गणवेश देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता एक राज्य-एक गणवेश धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना एक रंग, एक दर्जा असलेल्या सारख्याच गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
मोफत गणवेश योजनेबाबत संबंधित शाळा तसेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.

तसेच, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या
बागलाण (१९ हजार ७८५), चांदवड (११ हजार ४८३), देवळा (६ हजार ९७३), दिंडोरी (२४ हजार ३६७), इगतपुरी (२० हजार १०३), कळवण (१३ हजार ४७०), मालेगाव (२४ हजार ४८५), नांदगाव (१५ हजार ६६३), नाशिक (१३ हजार ७२५), निफाड (२२ हजार २२३), पेठ (१३ हजार ४९२), सिन्नर (१४ हजार ७५१), सुरगाणा (१७ हजार ६४), त्र्यंबकेश्वर (१६ हजार ६५८), येवला (१३ हजार ५२३).

असा असणार गणवेश
एक राज्य-एक गणवेश अंतर्गत मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट किंवा हाफ पँट, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाची सलवार, आकाशी रंगाची कमीज असे गणवेशाचे स्वरूप असणार आहे. एका गणवेशाला विद्यार्थ्यांच्या शर्टवरील शोल्डर स्ट्रिप आणि दोन खिसे असणे आवश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR