नवी दिल्ली : देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शांघाय सहयोग संघटनेत सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबरला पाकिस्तानला जाणार आहेत. जयशंकर यांच्या पाकिस्तान दौ-याबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही चांगली बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामान्यत: अशा बैठकांमध्ये पंतप्रधान सहभागी होण्यासाठी जातात, पण सध्या आपले परराष्ट्र मंत्री जात आहेत याचा मला आनंद आहे.
अब्दुल्ला पुढे म्हणाले की, मला आशा आहे. जयशंकर हे एससीओ व्यतिरिक्तही काही गोष्टींवर चर्चा करतील. भारत-पाक या दोन्ही देशांमधील संबंध कसे सुधारावेत, द्वेष कसा कमी करता येईल आणि दोन्ही देशांमधील ऋणानुबंध कसे वाढवता येईल यावर ते बोलतील अशी आशा अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.
काश्मीरमधील पत्रकारांशी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रमुखांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आणि इस्रायलचा निषेध केला. अब्दुल्ला म्हणाले, पश्चिम आशियातील परिस्थितीत इस्त्रायल ज्या प्रकारे लेबनान, सीरिया, इराण आणि पॅलेस्टाईनवर बॉम्बफेक करत आहे, ती बाब दु:खद आहे. जगाला वाचवायचे असेल तर युद्ध हा उपाय असूच शकत नाही. यात निष्पाप लोकांचा बळी जातो आहे.
गेल्या १० वर्षातील पहिला पाकिस्तान दौरा
परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तान दौरा हा गेल्या दशकातील कोणत्याही भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा पहिला दौरा असेल. गेल्या वेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हार्ट ऑफ एशिया परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेल्या होत्या. दोन्ही देशांमधील संबंध पाहता, द्विपक्षीय चर्चा होईल अशी आशा कमी आहे. मागच्या वेळी जेव्हा भारताने एससीओचे आयोजन केले होते, तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो त्यात सहभागी होण्यासाठी आले होते, पण दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा झाली नव्हती.
इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात
शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये ५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनेच्या कलम २४५ अंतर्गत लष्कर तैनात करण्यात आले आहे. लष्कराच्या तैनातीमागे दोन कारणे सांगितली जात आहेत. पहिले म्हणजे एससीओची शिखर परिषद आणि दुसरे म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने केलेला विरोध. त्यामुळे पाकिस्तानच्या राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.