मुंबई : अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने शुक्रवारी अहिल्यानगर नामांतराची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार आता अहमदनगर शहर हे अहिल्यानगर म्हणून ओळखले जाईल. तर महसूल विभागाची अधिसूचना जारी होईपर्यंत जिल्हा आणि तालुक्याचे नाव अहमदनगर असे राहणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे करण्यास अनुमती दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात ४ ऑक्टोबर रोजी राजपत्र प्रसिद्ध केले. आता महसूल विभागाकडून अहमदनगर तालुका आणि जिल्ह्याच्या नामांतराबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातील. या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाकडून अहमदनगर तालुका आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याबाबत अधिसूचना जारी केली जाईल. या कायदेशीर प्रक्रियेला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.