24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीआर. पी. हॉस्पिटलमधून उपचाराविना एकही रूग्ण परत जाणार नाही

आर. पी. हॉस्पिटलमधून उपचाराविना एकही रूग्ण परत जाणार नाही

परभणी/प्रतिनिधी
आर.पी. हॉस्पिटलमध्ये विविध योजनेतून माफक दरात उपचार केले जातात. तरी देखील ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल अशा रुग्णांचे आम्ही मोफत उपचार करू असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

आर.पी. हॉस्पिटलचे संस्थापक आ. डॉ. राहुल पाटील यांच्या वतीने जिल्ह्यातील २५७ पत्रकारांना मोफत आरोग्य कार्डचे वाटप रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी आर. पी हॉस्पिटल येथे करण्यात आले. यावेळी आ. डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, आर.पी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमीर, व्हॉईस ऑफ मिडिया कार्याध्यक्ष विजय चोरडिया, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने, प्रवीण चौधरी, प्रा.गजानन काकडे, माजी नगरसेवक प्रशास ठाकूर, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, शेख मुबारक उपस्थित होते.

यावेळी आरपी हॉस्पिटलमध्ये पत्रकारांना उपचार सुविधा मिळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजल्यापासून पत्रकारांची व त्यांच्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्ताच्या विविध चाचण्या, ईसीजी, हृदयरोग, नेत्र, त्वचा आदी बाबींच्या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांनी केल्या. तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधीचे देखील वाटप करण्यात आले.

पुढे बोलताना आ. डॉ. पाटील म्हणाले, पत्रकारांच्या विविध समस्या असून त्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी पत्रकारांना स्वतंत्र महामंडळाची गरज आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पत्रकारांच्या महामंडळाचा पहिला प्रश्न आपण मंजूर करून घेणार. यासोबतच परभणी शहरात ५ एकरमध्ये ५०० घरांची गृहनिर्माण संस्था उभारून पत्रकारांना घरे देणार असे आश्वासन आ.पाटील यांनी यावेळी दिले.

परभणी मतदार संघामध्ये आतापर्यंत ५ हजार महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीनसह प्रशिक्षण दिले. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळून दिली. ज्येष्ठ नागरिक मंचच्या माध्यमातून ३०० शाखा स्थापन करत दररोज कुठे ना कुठे आरोग्य शिबिर घेतले जात आहेत. त्यातून ४० हजार ज्येष्ठांची तपासणी झाली आहे. भारतातील सर्वात मोठे शिबिर घेऊन १७ हजार विविध प्रकारचे साहित्य ४ हजार ज्येष्ठांना वाटप केले आहे असे आ.पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष मस्के म्हणाले, पत्रकार आर्थिक सक्षम झाले पाहिजेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आ.डॉ.पाटील राज्याचे आरोग्य मंत्री होतील आणि त्यांनी संपूर्ण राज्यात आरोग्याची योजना राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ.नावंदर यांनी आ.पाटील यांच्या माध्यमातून पत्रकारांचा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यात येत आहे. ही बाब चांगली आहे असे सांगितले. यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाच्यावतीने आरोग्य कार्ड उपलब्ध करुन दिल्या बद्दल आ.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी आर.पी. हॉस्पिटलचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधवांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR