नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नक्षल प्रभावित राज्यांमधील सुरक्षा आणि विकासाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीनंतर नक्षल भागात अंतिम हल्ला केला जाईल. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा नायनाट करू. विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर नक्षलवाद संपवावा लागेल, असे अमित शहांनी सांगितले.
नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी नक्षलग्रस्त भागात कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ३० वर्षात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांकडून मारल्या केलेल्या लोकांची संख्या १०० पेक्षा कमी झाली आहे, असेही अमित शहा म्हणाले. मार्च २०२६ पर्यंत देशाला या समस्येतून मुक्तता मिळेल. नक्षलवाद्यांचे ८५ टक्के कॅडर संख्या छत्तीसगडपुरते मर्यादित आहे. छत्तीसगडमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत १९४ जण मारले गेले, ८०१ जणांनी शस्त्र सोडले आणि ७४२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, असे अमित शहांनी सांगितले.
याचबरोबर, नक्षलवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन अमित शहांनी केले. आम्ही राज्यांमध्ये राज्य पोलिस आणि संयुक्त कार्यदल स्थापन केले आहे, परंतु आम्हाला त्याच्या श्रेणीबद्धतेवर देखील काम करावे लागेल, असे ते म्हणाले.