नवी दिल्ली : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झाले. यानंतर आता या दोन्ही निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहे. या निकालासाठी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. दरम्यान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.
हरियाणातील मतदारांचा सहभाग जवळपास ६७.९० टक्के इतका होता. यामध्ये सिरसा जिल्ह्यातील एलेनाबाद विधानसभेच्या जागेवर सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले. दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी हरियाणात एकाच टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी प्रत्येक्षात ८ ऑक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेत येणार? याबाबत सर्व स्पष्ट होईल.