मुंबई : सन २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपने दर्शवली होती, पण संजय राऊतांनी त्यामध्ये खोडा घातला. त्यामुळेच आमचा संजय राऊत यांच्यावर राग आहे. त्यांनी शिवसेनेची वाट लावली, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.
२०१९ च्या निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेनेला बहुमत दिले होते. पण मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे अशी मागणी शिवसेनेची होती. संजय राऊत त्यावेळी उद्धव ठाकरेंचे कान भरायचे. त्यामुळे हा वाद वाढतच गेला. शेवटी पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यायला भाजपने तयारी दर्शवली होती. त्यासाठी सेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावे असेही सांगितले होते. पण संजय राऊतांनी त्यामध्ये खोडा घातला. त्यांची गाडी सिल्व्हर ओकच्या(शरद पवारांचे निवासस्थान) दिशेने गेली. जर भाजपसोबत युती करायचीच नव्हती तर एवढं सगळं करायची काय गरज होती? असा सवाल शिरसाट यांनी केला.
शिवसेना-भाजपची ही युती तुटू नये यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांनीही त्यासाठी प्रयत्न केला. पण तुला जायचे असेल तर तू जा असे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले. त्यामुळे आमचा नाईलाज झाला. हे जे काही घडलं ते संजय राऊतांमुळे. त्यामुळे आमचा त्यांच्यावर जास्त राग आहे. संजय राऊतांचे शरद पवारांवर प्रेम आहे त्याला कुणाचाही हरकत नाही, पण त्यासाठी त्यांनी स्वताच्या पक्षाची वाट लावली, असा दावा संजय शिरसाठ यांनी केला.