19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकरी नेते रविकांत तुपकर ‘मातोश्री’वर

शेतकरी नेते रविकांत तुपकर ‘मातोश्री’वर

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणा-या विधानसभा निवडणुकांचे सा-यांना वेध लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता मोर्चेबांधणीसाठी सज्ज झाला आहे. अशातच आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असून या भेटीला वेगळे महत्त्व असल्याचे बोलले जात आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर आगामी काळात रविकांत तुपकर हे महाराष्ट्र दौरा करत असून जवळपास २५ जागांवर उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.

लोकसभेला बुलडाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. यावेळी त्यांचा निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मते घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होत असल्याची माहिती आहे.

तुपकरांनी काढला नवा पक्ष
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आले आहे. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी पुण्यात महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा केली होती. तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर २५ जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR