15.3 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्ररतन टाटांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत संमत!

रतन टाटांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत संमत!

मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत रतन टाटा यांच्यावर शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. याबरोबरच, रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हा समाजउभारणीचा प्रभावी मार्ग आहे. नवनवीन उद्योगांच्या उभारणीमुळेच देश प्रगतिपथावर नेता येतो. रतन टाटा यांच्यासारख्या विचारवंत आणि समाजसेवकांनी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती प्रामाणिक कळवळा बाळगला. त्यांनी उद्योगक्षेत्रातच नव्हे तर समाजाच्या उभारणीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळली. टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्ट परोपकारी काम केले. त्यांच्या नैतिक मूल्यांची जपणूक इतर उद्योजकांसाठी व उद्योगातील भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. स्वातंत्र्यानंतर देशाची पुनर्निर्मिती करण्यामध्ये टाटा समूहाचा सिंहाचा वाटा होता.

रतन टाटा यांचे नाव मोटारीपासून मिठापर्यंत, आणि कॉम्प्युटरपासून कॉफी-चहापर्यंत अनेक उत्पादनांशी जोडले जाते. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा आणि कोविड काळात पीएम रिलीफ फंडाला दिला गेलेला १५०० कोटी रुपयांचा मदतीचा हात अद्वितीय होता. यावेळी त्यांनी रुग्णांसाठी आपल्या हॉटेलचा वापर देखील केला, ज्यामुळे त्यांचा समाजातील मोठेपणा सिध्द झाला.

रतन टाटा नेहमीच तरुणांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यात आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात त्यांनी तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी इनोव्हेशन सेंटर सुरू केले. त्यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यातून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR