दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूक करणे आणि मानसिक आजारांबद्दल माहिती देणे हा आहे. ह्यावर्षीचे ब्रीदवाक्य कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊया असे आहे.
शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु तरीही तो अनेकदा दुर्लक्षित होतो. जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२४ निमित्ताने, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात उद्भवणाऱ्या नव्या युगाच्या आणि जुन्या ज्ञात समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. एक मानसोपचार तज्ज्ञ (सायकियाट्रिस्ट) म्हणून, समाजातील मानसिक आरोग्याच्या समस्यांवर आणि त्यांच्या उपाययोजनांवर एक दृष्टिकोन मांडत आहे.
नव्या युगाच्या उदयोन्मुख मानसिक आरोग्य समस्या:
– मोबाइल आणि सोशल मीडिया व्यसन:
– आव्हान: तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे विशेषतः तरुणांमध्ये मोबाइल आणि सोशल मीडियाचे व्यसन वाढत आहे.
– उपाय: तंत्रज्ञानाचा संतुलित वापर, डिजिटल डीटॉक्स आणि तज्ञांचे मार्गदर्शन.
– कोरोना काळातील लॉकडाऊन आणि एकलकोंडेपणाचे परिणाम:
– आव्हान: लॉकडाऊनमुळे सामाजिक एकाकीपणा वाढला आहे, ज्यामुळे मानसिक तणाव, कौटुंबिक आणि व्यसनाधीनता, नैराश्याच्या समस्या वाढल्या आहेत.
– उपाय: सामाजिक संपर्काचे संवर्धन, ऑनलाइन व टेलीफोनिक समुपदेशन सेवा, आणि समर्थन (स्वमदत) गटांची स्थापना व संगोपन.
– सांस्कृतिक आणि सामाजिक दबावामुळे निर्माण होणारे ताण:
– आव्हान: कट्टर मतप्रवाह, सांस्कृतिक अपेक्षा आणि सामाजिक दबावांमुळे मानसिक ताण वाढत आहे.
– उपाय: व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर, ताण व्यवस्थापन तंत्रे, भावनिक नियमन आणि कुटुंबव्यवस्था व परिवार संबंधांची जोपासना.
जुन्या ज्ञात मानसिक आरोग्य समस्या:
– नैराश्य (डिप्रेशन):
– आव्हान: नैराश्याच्या मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे आणि अनेक लोकांना अद्याप या समस्येची पूर्णपणे माहिती नाही.
– उपाय: जागरूकता कार्यक्रम, समुपदेशन, औषधोपचार, आणि आत्मविश्वास वाढविणे.
– आत्महत्येची प्रवृत्ती:
– आव्हान: आत्महत्येच्या दुर्देवी घटनांमध्ये वाढ होत आहे, विशेषतः युवकांमध्ये.
– उपाय: आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम, त्वरित मानसोपचार, आणि मानसिक आरोग्य शिक्षण.
– मानसिक आजार, व्यसनाधीनता व विकृत व्यक्तिमत्वाच्या समस्या:
– आव्हान: मानसिक आजार व विकृत व्यक्तिमत्वाच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे, परंतु अद्याप समाजात त्याबद्दलची जागरूकता कमी आहे. समाजातील विशेषतः तरुणाईतील व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
– उपाय: मानसिक आरोग्य शिक्षण, नियमित तपासण्या, आणि मानसोपचार तज्ञांची मदत. लवकर मदत घेतल्यास आजार लवकर बरा होऊ शकतो किंवा तीव्रता कमी होऊ शकते.
– मानसिक आरोग्य समस्या सोडवण्यासाठी उपाय:
– शिक्षण आणि जागरूकता: मानसिक आरोग्य शिक्षण हे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समाविष्ट करणे.
– समुपदेशन आणि थेरपी: मानसोपचार तज्ज्ञांनी चालविलेल्या समुपदेशन केंद्रांची स्थापना आणि थेरपी सेवा उपलब्ध करणे.
– कौटुंबिक संवाद : परिवारांनी मानसिक आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि मुक्तपणे व्यक्त होण्यास समर्थन करणे.
– समाजाची भूमिका: समाजाने मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे तिरस्कार न करता, कलंकित भावनेने न पाहता, सहानुभूतीने पाहणे आणि मदत करणे.
– सरकारी धोरणे: मानसिक आरोग्याच्या सेवांसाठी सरकारने ठोस धोरणे आखणे आणि मनुष्यबळ, औषधोपचार, विमासेवा व बजेट वाढविणे.
– जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त, चला मानसिक आरोग्याबद्दल जागरूक होऊया आणि एकत्रितपणे मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहन देऊया.
जास्त माहिती आणि मदतीसाठी संपर्क:
– डॉ. आशिष चेपुरे, मानसोपचार तज्ज्ञ
लातूर, महाराष्ट्र फोन: [९८६०९५३३९२]