27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसंपादकीयअनमोल ‘रतन’!

अनमोल ‘रतन’!

जगात अनेक नामवंत व गर्भश्रीमंत उद्योगपती आहेत. सामान्यांच्या मनात त्यांच्याबद्दल कुतुहलही भरपूर असते. त्यांची संपत्ती, जीवनशैली वगैरे बाबतचे किस्से जनसामान्यांना चवदार वाटतात. मात्र, हे उद्योगपती आपले आहेत, अशी आपुलकीची व आपलेपणाची भावना जनसामान्यांच्या मनात अभावानेच पहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या असण्या-नसण्याने सामान्यांवर फारसा फरक पडत नाही. मात्र, उद्योगरत्न रतन टाटा यांच्या निधनाने अवघा देश ज्या शोकसागरात बुडाला, जी हळहळ व्यक्त झाली त्यावरूनच त्यांचे वेगळेपण लक्षात यावे! रतन टाटा यांच्या निधनाची बातमी धडकताच देशातील नव्हे तर जगभरातील सामान्यातील सामान्य व्यक्तीच्या मनातही आपल्याच घरातील आपली व्यक्ती आपल्याला सोडून गेल्याची तीव्र शोकभावना निर्माण झाली.

प्रत्येकाला ‘आपलासा वाटणे’ हे भाग्य कमविणारे विरळच! त्यात प्रत्येकाला त्या व्यक्तीबद्दल आदर असणे हे आणखीनच विरळ! रतन टाटा यांना हे भाग्य लाभले. देशातील असे कोणते गाव नाही आणि जगातील असा कोणता देश नाही जिथे टाटांचे नाव पोहोचलेले नाही. पाच पिढ्यांनी अतिशय कष्टाने रुजविलेल्या टाटा नावाच्या वृक्षाला रतन टाटा यांनी आपल्या अविरत श्रमाने, कष्टाने, दूरदृष्टीने व प्रामाणिकपणाने जगभर पोहोचविले व त्याचा अक्षरश: वटवृक्ष बनवला. ‘टाटा’ हा ब्रँड जगभर पोहोचविताना रतन टाटांनी त्याला नीतिमत्तेची, प्रामाणिकपणाची, नम्रतेची, माणुसकीची आणि विश्वासाची अतूट जोड दिली त्यामुळे हा ब्रँड केवळ जगभर विस्तारला नाही तर या ब्रँडने प्रत्येकाच्या मनात आपलेपणाची अत्यंत विरळ व अपवादात्मक भावना निर्माण करण्यात यश मिळवले! त्यामुळे रतन टाटा उद्योगपती म्हणून तर मोठे ठरलेच पण त्याहीपेक्षा माणूस म्हणून फार मोठे ठरले. उद्योजक म्हणून उद्योगाचा विस्तार करताना बहुतांश वेळा आपल्या संपत्तीत वाढ करण्याचाच विचार प्राधान्याने त्यामागे असतो.

मात्र, रतन टाटांच्या उद्योग विस्तारामागे संपत्तीनिर्मिती दुय्यम व सामान्य माणसाचे हित साधणे, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे व देशाच्या विकासात, प्रगतीत योगदान देण्याचा विचार प्रथम प्राधान्याचा होता. आपल्या उद्योग विस्ताराला सामाजिक बांधीलकी व सामान्यांच्या कल्याणाची अतूट जोड देणारे रतन टाटा म्हणूनच उद्योगक्षेत्रातील ‘अनमोल रतन’ ठरले व प्रत्येकाच्या मनातील ‘आपला माणूस’ ठरले! २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्माला आलेला हा अनमोल रतन जेआरडी टाटा यांनी सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष बनला व सुमारे दोन दशके त्यांनी अध्यक्ष म्हणून या समूहाचा कारभार सांभाळताना आपल्या कल्पकता, कष्टाळूपणा, सचोटी, विनम्रता व प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर जगभर टाटा ब्रँडचा विस्तार तर केलाच पण या ब्रँडला प्रतिष्ठा, पत व आदरही मिळवून दिला. त्यांच्याच काळात टाटा समूहाने टेटली, जग्वार अँड लँडरोव्हर, कोरस या जगविख्यात कंपन्यांचे अधिग्रहण केले आणि देश म्हणून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली! समूहाचा विस्तार करताना त्याला समाजहित,

सामाजिक बांधीलकी व माणुसकीची जोड रतन टाटा यांनी दिल्याने टाटा समूह हा जगातला दानशूर समूह ठरला. टाटा देशाच्या शिक्षण, वैद्यकशास्त्र व ग्रामीण भागाच्या विकास व प्रगतीसाठी आग्रही होते. त्यातूनच २०१४ साली टाटा समूहाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई या संस्थेला भरीव देणगी दिली. मर्यादित संसाधनासह कुंठित जीवन जगणा-या सामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन या संस्थेची त्यांनी स्थापना केली. सामान्यांचे चार चाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रतन टाटा यांनी नॅनो कारची कल्पना प्रत्यक्षात उतरवली व अवघ्या १ लाख रुपयांमध्ये चार चाकी गाडी सामान्यांना उपलब्ध करून दिली. स्कूटरवरून प्रवास करणा-या भारतातील सामान्य कुटुंबांना त्यांचे चार चाकी गाडीने प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक कार्यकारी केंद्र तयार करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. याच संस्थेत रतन टाटा यांनी स्वत: शिक्षण घेतले होते.

संस्थेने त्यांच्या सन्मानार्थ इमारतीतील सभागृहास ‘टाटा हॉल’असे नाव दिले. सर्वच क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण गोष्टींची आवड हा रतन टाटा यांचा आणखी एक गुण! त्यातून टाटा समूहाचा विस्तार सामान्यांच्या ताटातील मिठापासून चहा आणि तंत्रज्ञानापर्यंत झाला! रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती- तंत्रज्ञान, दूरसंचार, ऊर्जा, आतिथ्य, सेवाक्षेत्र ते ताटातले मीठ असा टाटा समूहाचा प्रचंड मोठा व सर्वव्यापी विस्तार हे रतन टाटांचेच श्रेय आणि विशेष म्हणजे या सगळ्या विस्तारामागे असणारी सामान्यांचे जीवनमान उंचावण्याची प्रांजळ भावना हे रतन टाटांचे वैशिष्ट्य! अशा या देशभक्त उद्योगपतीला भारत सरकारने २००० साली ‘पद्मभूषण’ आणि २००८ साली ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवले खरे पण त्यांना त्यांच्या जिवंतपणी भारतरत्न पुरस्काराने गौरविले जावे ही देशातील सामान्यांची इच्छा मात्र अपुरीच राहिली. महाराष्ट्र सरकारने रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच आता त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे.

केंद्र सरकार त्याची योग्य दखल घेऊन देशातील सामान्य जनांच्या रतन टाटा यांच्याबाबत असलेल्या आपुलकी, प्रेम, आदर व आपलेपणाच्या भावनांची कदर करेल ही अपेक्षा! असो!! उद्योगपती म्हणून कार्यरत असताना व्यवसायातील गळेकापू स्पर्धेतही आयुष्यभर आपली नैतिकता, प्रामाणिकपणा, सचोटी, सामाजिक बांधीलकीचे भान आणि सामान्य माणसांबद्दलची कणव जोपासणे हे खरोखरच अत्यंत अवघड काम! मात्र, रतन टाटा यांनी ही अग्निपरीक्षा आयुष्यभर पदोपदी दिली आणि तरीही टाटा समूहाचा सर्वव्यापी यशस्वी विस्तार करून दाखविला आणि हे करताना सचोटी, प्रामाणिकपणा व विनम्रता कधीच सोडली नाही. हे फक्त अनन्यसाधारण व्यक्तीच करू शकतो. आपल्या बोली भाषेत अशा व्यक्तीला आपण संत संबोधतो. रतन टाटा असेच उद्योगक्षेत्रातले संत पण त्यांनी कधीच आपला साधेपणा सोडला नाही की, यश कधीही त्यांच्या डोक्यात गेले नाही. भारतीयांसाठी म्हणूनच रतन टाटा हे ‘अनमोल रतन’ होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. या ऋषितुल्य ‘आपल्या माणसा’ला एकमत परिवाराची विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR