उदगीर : प्रतिनिधी
उदगीर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या तत्त्वानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जात असला तरीही दुस-या एखाद्या जागेची तडजोड करून उदगीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडवून घेतला जाईल. असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे कर्नाटकाचे वर्किंग कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी विधान्ह्यापरिषद सदस्य आ. ए वसंत कुमार यांनी दिले.
उदगीर येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या बूथ प्रमुख मेळावा व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी कर्नाटक काँग्रेसचे प्रवक्ते रज्जाक उस्ताद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंखे, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार उषाताई कांबळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव हुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, काँग्रेसचे जळकोट तालुकाध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, अॅड पद्माकर उगिले यांच्यासह उदगीर विधानसभा मतदार संघातील मान्यवर उपस्थित होते. आमदार ए. वसंत कुमार म्हणाले की, उदगीर विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्यांची इच्छा काँग्रेस पक्षाचा आमदार हवा अशी आहे. गेल्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा गेली आणि त्या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदाराने गद्दारी केली. त्यामुळे कार्यकर्त्याचे मोठे खच्चीकरण झाले.
हे खच्चीकरण भरून काढण्यासाठी आता काँग्रेसलाच उमेदवारी मिळाली पाहिजे, हा अट्टाहास कार्यकर्त्यांचा असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाचे वारे सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेची होणार आहे, असा विश्वासन त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अभय साळुंखे, काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, मारुती पांडे, धनाजी जाधव, शीलाताई पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. इच्छुक उमेदवार उषाताई कांबळे यांनी या ठिकाणी काँग्रेसच का पाहिजे? या संदर्भात माहिती दिली.