अमरावती : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावती येथे शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी जिल्हाध्यक्षासह २८ पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देत बंडखोरीचे संकेत दिले आहेत. लोकसभेत पक्षविरोधी काम करणा-या नेत्यांच्या सांगण्यावरूनच माझ्याकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदीप राऊत यांनी केला आहे.
जिल्ह्यातील २८ पदाधिका-यांसह सामूहिक राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सोपविणार असल्याची माहिती राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ ऑक्टोबरला प्रदीप राऊत यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढून प्रदेश संघटन सचिव पदावर नियुक्ती केली आहे. परंतु हा बदल करताना कोणतीही पूर्व सूचना पक्ष नेत्यांनी दिली नसल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. पाच महिन्यापूर्वीच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती.
या कार्यकाळात त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले. परंतु स्थानिक नेत्यांनी त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्याने त्यांना पदावरून काढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभेत याच नेत्यांनी नवनीत राणा यांच्याकडून पैसे घेऊन त्यांचे काम केले होते. त्यासंदर्भातील पुरावेदेखील वरिष्ठांना दिले आहेत. अचानक केलेल्या कारवाईमुळे प्रदेश संघटकपदाचा राजीनामा देत असून जिल्ह्यातील इतरही २८ पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत.
राष्ट्रवादीत येण्यासाठी नेत्यांची रिघ
एकीकडे शरद पवार गटातील पदाधिकारी सामुहिक राजीनामे देत असले तरी राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी नेत्यांची रिघ लागलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपासून याची सुरुवात झाली. मोहिते पाटील पुन्हा पवारांकडे गेल्यानंतर आता कोल्हापूरातील समरजितसिंह घाटगे, इंदापूरातील हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. येत्या १४ ऑक्टोबरला फलटणमधील रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण हेदेखील शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा आहे.