सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाने सह्याद्री कोकण कॉरिडॉरची घोषणा केल्यानंतर आता वन्य प्राण्यांनाही सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जंगल परिसर सुरक्षित वाटू लागला आहे. सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच वन्य प्राण्यांच्या जनगणनेत आठ वाघांची नोंद झाली आहे. यात तीन नर आणि पाच मादींचा समावेश आहे. जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत हे वाघ दिसून आले आहेत.
सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून जनावरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढू लागले होते. त्यामुळे हे हल्ले वाघाकडूनच होत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते. तसेच काही ठिकाणी वाघ प्रत्यक्षात वन कर्मचा-यांना दिसले. जानेवारी महिन्यात वाघांची जनगणना केली. यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत जंगलातील प्रमुख ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. २०१४ च्या जनगणनेत वाघांची संख्या ही पाच होती तर २०१९ मध्ये हीच संख्या शून्यावर आली होती. मात्र, आता २०२४ मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.