मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीने मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना देखील मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा खुलासा आरोपीने केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपीने आमदार झिशान सिद्दिकी हेदेखील बिश्नोई टोळीचे लक्ष्य होते, असे म्हटले आहे.
एका पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार आरोपींना बाबा सिद्दिकी यांच्यासोबत झिशान सिद्दिकी यांना देखील मारण्याची सुपारी देण्यात आली होती.आरोपीने याबाबतचा खुलासा केला आहे. तसेच दोघांनाही एकत्र मारण्याची संधी मिळाली नाही तर जो समोर दिसेल, त्याला ठार मारावे, असे आदेशदेखील आरोपींना देण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी हरियाणाच्या गुरमेल बलजीत सिंग आणि उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यपला अटक केली आहे, त्यापैकी गुरमेल हा गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला आरोपी आहे. तिसरा आरोपी शिवानंद कुमार हा घटनास्थळावरुन पसार झाला. शनिवारी रात्रीपासून पोलिस त्याचा तपास करत आहेत. सकाळी तो पनवेलच्या आसपास दिसून आला होता. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. त्याला पकडण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत अनेक ठिकाणी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हे तिन्ही आरोपी कुर्ला येथून दररोज वांद्रे येथे जात होते. ते कुर्ला येथे भाड्याने रुम करुन राहत होते. हे सर्व आरोपी ऑटो रिक्षाचा वापर करत होते. आरोपी बाबा सिद्दिकी आणि त्यांच्या मुलाशी संबंधित ठिकाणे, त्यांचे घर, कार्यालय आणि कार्यक्रमांवर पाळत ठेवत होते. गोळीबार करणा-यांना झिशानलाही लक्ष्य करण्याचे आदेश मिळाल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी दोघेही एकाच ठिकाणी होते. याबाबतची माहिती आरोपींना देण्यात आली होती. त्यानुसार हा कट रचला होता, अशीही माहिती पुढे येत आहे.