बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात असणा-या दोन आरोपींची नुकतीच जामिनावर सुटका झाली. मात्र, सुटकेनंतर बंगळुरूमध्ये या आरोपीचे गळ्यात हार घालून जंगी स्वागत करण्यात आल्याचा धकाद्दायक प्रकार समोर आला आहे. बंगळुरू न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी दोघा आरोपींचे हार घालून व भगवी शाल देऊन स्वागत केले. यासोबतच यावेळी त्यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात डांबण्यात आले होते, असा दावाही त्याचा सत्कार करणा-यांनी केला.
गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील परशुराम वाघमोरे व मनोहर यदावे या आरोपींना बंगळुरू सत्र न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघे तुरुंगात होते. ९ ऑक्टोबरला जामीन मंजूर झाला असला, तरी त्यांची सुटका मात्र बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा तुरुंगातून ११ ऑक्टोबर रोजी झाली.दरम्यान, हे दोघे आरोपी त्यांच्या गावी विजयपुरामध्ये पोहोचल्यानंतर काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेच्या सदस्यांनी फुलांचे हार, भगवी शाल घालून त्यांचे स्वागत केले.
५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची मोटरसायकलवरून आलेल्या तीन व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात सातत्याने परखड भूमिका मांडत असत तसेच, डाव्या विचारसरणीमुळे त्यांची हत्या करण्यात आली होती.