धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण होऊन मंगळवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री व पहाटे पावसाळ्यातील दिवसाप्रमाणे जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी वीज पडून जनावरे दगावली असल्याचे वृत्त आहे. हा पाऊस रब्बी पिकांना पोषक असला तरी द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. धाराशिव, तुळजापूर, कळंब तालुक्यातील काही महसूल मंडळात दमदार पाऊस झाला आहे.
धाराशिव शहर व परिसरातील गावात मंगळवारी पहाटेच्या सुमारास मेघगर्जनेसह दमदार पावसाला सुरूवात झाली. वादळी वा-यामुळे व पावसाच्या तडाख्याने रब्बी हंगामातील ज्वारीचे पिक आडवे झाले आहे. धाराशिव शहरालगत असलेल्या खानापूर, जाधववाडी, राघुचीवाडी, कौडगाव, आंबेव्होळ शिवारात मोठमोठी झाले उन्मळून पडली असल्याचे जाधववाडी येथील शेतकरी बाळासाहेब जाधव यांनी सांगितले. पानवाडी ता. धाराशिव येथील शेतकरी महातम गणपती कदम यांची देवणी जातीची गाय तेर शिवारातील शेतात बांधलेली होती.
मंगळवारी पहाटे गायीच्या अंगावर वीज पडून गाय ठार झाली आहे. तेरचे तलाठी व पशुवैद्यकीय अधिका-यांनी मृत गायीचा पंचनामा केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात धाराशिव जिल्ह्यात सरासरी एवढाही पाऊस झालेला नाही. परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बीची पेरणी मोठ्या क्षेत्रावर झालेली नाही. पाणीटंचाईमुळे रब्बीचे क्षेत्र घटले आहे. काही शेतक-यांनी अल्प ओलीवर नशीबावर हवाला ठेवून रब्बीची पेरणी केली होती. त्या शेतक-यांच्या पिकाला अवकाळी पावसाने जीवदान मिळाले आहे.