मुंबई : महाराष्ट्रातील २३ अपर जिल्हाधिका-यांना भारतीय प्रशासकीय सेवेत अर्थात आयएएसपदी बढती देण्यात आली आहे. यामध्ये एकट्या पुण्यातील ४ अधिका-यांना आयएएसचा दर्जा मिळाला आहे. पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने २३ अप्पर जिल्हाधिकारी आयएएसपदी बढती देण्यात आली आहे.
हे सर्व अधिकारी १९९७ ते १९९८ च्या बॅचचे असून महाराष्ट्र नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारीपदी ते नियुक्त झाले होते. यामुळे प्रशासनात आता त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सचिव, महामंडळाचे प्रमुख अशा वरिष्ठ पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अधिकारीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, दर पाच वर्षांनी आयएएस अधिका-यांच्या संख्येचा रिव् ू घेतला जातो, यामुळे यंदा इतक्या मोठ्या प्रमाणात अधिका-यांना बढती मिळाल्याचे सांगितले जात आहे. सेवा जेष्ठता, गुणवत्ता, मागील दहा वर्षातील गोपनीय अहवाल, विभागीय चौकशी नसणे, या सगळ्या बाबी तपासून राज्य नागरी सेवा संवर्गातून भारतीय प्रशासकीय सेवेत भरती देण्यात आली आहे.