लातूर : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी तीन टप्प्यात पाऊस पडला. सकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर पाऊस थांबला. सायंकाळी ६.४३ वाजण्याच्या सुमारास पुन्हा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. रात्री ८.०५ वाजण्याच्यासुमारास मात्र वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.
संपूर्ण दिवसभरात पावसाचे तीन रुप पहावयास मिळाले. सकाळी अगदी शांतपणे पावसाला सुरुवात झाली. रिमझीम ते किरकोळ स्वरुपाचा पाऊस काही मिनिटेच पडला. त्यानंतर पाऊस थांबला. दिवसभर उन्ह, सावल्यांचा खेळ सुरु राहीला. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली आणि पावसाला सुरुवात झाली. पाच ते सात मिनिटे पाऊस पडला आणि थांबला. हाही पाऊस शांत होता. काही वेळानंतर पाऊस आला तो रौद्ररुप धारण करुन. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट खुप मोठ्या प्रमाणात होता. वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांमुळे काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दहा मिनिटांनी पाऊस थांबला परंतू, पुन्हा पाऊस सुरु होईल, अशी परिस्थिती होती.