मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने गुरुवारी नवी दिल्लीतून चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केली. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात भाजप आता कोणाला मैदानात उतरविणार, हे पाहावे लागेल.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण हे नांदेडमधून काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री आणि नांदेड जिल्ह्यातील नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेससमोर मोठे राजकीय आव्हान होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर मात करून नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले होते.
लोकसभेवर निवडून आल्यानंतर काही दिवसांतच वसंतराव चव्हाण यांची प्रकृती ढासळली. हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना २६ ऑगस्ट २०२४ रोजी चव्हाण यांची प्राणज्योत मालवली. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करताना नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली.
या पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार असून काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. या अगोदर जिल्हा कॉंग्रेसने रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा ठराव संमत केला होता. त्यानंतर आज अधिकृत घोषणा केली. दरम्यान, भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.