24.3 C
Latur
Monday, October 21, 2024
Homeक्रीडामहाराष्ट्राच्या ऋतुराजचा मुंबईत झंझावात

महाराष्ट्राच्या ऋतुराजचा मुंबईत झंझावात

 ११४ च्या स्ट्राईक रेटने ठोकले शतक

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या बीकेसीतील मैदानात सध्या मुंबई आणि महाराष्ट्र संघात रणजी सामना सुरू आहे. या सामन्यात पहिल्या डावात ३१५ धावांची भक्कम आघाडी घेत अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघाने मजबूत पकड घेतली होती. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या दुस-या डावात कर्णधार ऋतुराज गायकवाडचा झंझावात पाहायला मिळाला.

सामन्याच्या दुस-या दिवशी ७२ धावांवर नाबाद असलेल्या ऋतुराजने रविवारी तिस-या दिवशी शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच बॉलवर स्क्वेअर लेग बाऊंड्रीवरून षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर अवघ्या ८७ चेंडूत त्याने आपले शतकही पूर्ण केले. त्यात १४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. ऋतुराजचे प्रथम श्रेणी कारकीर्दीतली हे सातवे शतक ठरले.

म्हात्रे-श्रेयस अय्यरची शतकं
त्याआधी मुंबईने पहिल्या डावात ४४१ धावांचा डोंगर उभारला. मुंबईचा अवघ्या १७ वर्षांचा सलामीवीर आयुष म्हात्रेने कारकीर्दीतले पहिले शतक झळकावले. त्याने १७६ धावांची खेळी केली. तर अनुभवी श्रेयस अय्यरनेही १४२ धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात ३१५ धावांची मोठी आघाडी मिळाली. दरम्यान यंदाच्या सीझनमध्ये महाराष्ट्राची गोलंदाजी हा पुन्हा कळीचा मुद्दा ठरतेय. एकट्या हितेश वाळुंजने ३६ षटकं गोलंदाजी करताना ६ विकेट्स घेतल्या. पण आयपीएल स्टार राजवर्धन हंगर्गेकरसह इतर गोलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आला नाही.

मुंबईचेच वर्चस्व
रणजी करंडकात महाराष्ट्र आणि मुंबई हो दोन्ही संघ आजवर दहा वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी ३ वेळा मुंबईने तर दोन वेळा महाराष्ट्राच्या संघाने विजय मिळवला. तर पाच सामने अनिर्णीत अवस्थेत संपले. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राला आजवर एकदाही रणजी विजेतेपद मिळवता आलेले नाही. तर दुसरीकडे मुंबईने मात्र ४२ वेळा ही ट्रॉफी उंचावली आहे. यंदा ऋतुराज गायकवाडच्या महाराष्ट्र टीमकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR