नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी इथे प्रशांत विहार परिसरात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सीआरपीएफ स्कूलबाहेर हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असून तणावाचे वातावरण आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या शाळेच्या भिंतीजवळ स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की परिसरातील काही गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून आले.
स्थानिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. दिल्ली पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. चौकशीनंतरच हे प्रकरण नेमकं काय आहे हे समजू शकेल.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात वापरण्यात आलेली स्फोटकं कमी तीव्रतेची असण्याची शक्यता आहे. एक छोटा क्रूड बॉम्ब देखील असू शकतो. स्पेशल सेलचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. गरज भासल्यास एनएसजी टीमलाही बोलावले जाणार आहे. दरम्यान, तपासासाठी जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेजही गोळा केले जात आहे.
रोहिणीचे डीसीपी अमित गोयल यांनी सांगितले की, स्फोटाचे खरे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता हे सध्या स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञांचे पथक या घटनेचा सखोल तपास करत असून लवकरच नेमकं काय घडलं हे स्पष्ट होईल.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे (एफएसएल) पथक घटनास्थळी पोहोचले आहे. एफएसएल टीम स्फोटाच्या कारणाचा तपास करेल आणि हा हल्ला आहे की अपघात आहे हे स्पष्ट करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे शेजारी उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या तसेच काही घरांच्या काचा फुटल्याचेही समजते.