परभणी : रावे उपक्रमात सहभाग घेतलेल्या ग्रामकन्या आणि ग्रामदूत विद्यार्थ्यांनी ग्रामीण कुटुंबांपर्यंत सामुदायिक विज्ञानाचे तंत्रज्ञान पोहोचविल्याचे समाधान आहे. नागरिकांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच नैतिक मूल्यांची जपणूक करावी. पालकांनी बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक लक्ष देण्याचे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी रावे (ग्रामीण जागरुकता कायार्नुभव कार्यक्रम) उपक्रमांतर्गत रायपूर येथे शेतकरी कुटुंबांसाठी विविध उपक्रम राबवले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकरी कुटुंबांची कौशल्यवृद्धी करत त्यांना सामुदायिक विज्ञान तंत्रज्ञान अवगत करून दिले. या तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील कुटुंबांना आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश होता. दि. १८ ऑक्टोबर रोजी रायपूर येथे या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून दत्ता गिरी आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भीमराव सूर्यतळ उपस्थित होते.
प्रास्तविक कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले. यावेळी संपर्क कुटुंबातील सदस्य ममता मस्के यांनी ग्रामदूत व ग्रामकन्या यांच्या मार्गदर्शनामुळे कुटुंबांना सामुदायिक विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्यविकास साध्य झाल्याचे सांगितले. शालेय विद्यार्थिनी वैष्णवी बालशंकर हिनेही या उपक्रमातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी आणि रावेच्या ग्रामदूत व ग्रामकन्या यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे रावे परीक्षक डॉ. अश्विनी बिडवे, डॉ. अश्विनी बेद्रे, प्रा. ज्योती मुंडे, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आकांक्षा थोरात यांनी केले.